Ad will apear here
Next
‘हिंडायची बी एक येगळी लत आसती’


कार्तिक महिना संपत आला, की पुण्याच्या रस्त्यांवर मेंढरांचे कळप दिसायला लागतात. मागे हातात मजबूत काठी घेतलेला एखादा म्हातारा असतो, भगव्या किंवा पिवळ्या रंगाचा फेटा बांधलेला. मेंढरांच्या पुढे दोन-तीन लहानखुरी घोडी असतात, त्यांच्यावर लादलेला सगळा संसार, गाडगी-मडकी, दुरड्या, कपड्यांची बोचकी आणि ह्या सगळ्या गाठोड्यांच्या अगदी वर ऐटीत बसलेली एक-दोन लहान मुलं, आपल्या काळ्याभोर काजळमाखल्या डोळ्यांनी इथेतिथे भिरीभिरी बघत बसलेली. पुढे त्या दोन्ही तट्टांचा कासरा धरून एखादी धनगरीण चालत असते. ताठ कण्याने. तिच्या डोईवरचा पदर वाऱ्याने उडत असतो. मग एखादं रिकामं शेत बघून तिथे पाल पडतो. तीन दगडांच्या चुली लावल्या जातात आणि एखाद्या चार ठिकाणी पोचे आलेल्या आलीमिनच्या भांड्यात कसलासा तांबडाजाळ रस्सा रटारटा शिजत असतो. का कोण जाणे, मला अशा पालाचं जबरदस्त आकर्षण आहे. धनगरांचा असा पाल बघितला, की खूप वेळेला माझ्या मनात येतं, त्यांना विचारावं, ‘मी पण तुमच्याबरोबर चार घास खाऊ का?’ पण मध्यमवर्गीय भिडस्तपणा आड येतो. आज असाच एक मेंढरांचा कळप बघितला आणि मला एक-दोन वर्षांमागे भेटलेली जाईबाई आठवली. 

मी जिथे राहते त्या संकुलात माझा बंगला टोकाला आहे. माझ्या बागेपलीकडे एक माळ आहे. तिथे दुसऱ्या कुणाचे तरी प्लॉट पाडून ठेवलेले आहेत. माळावर उगवलेलं सोनेरी गवत, बोरीची एक-दोन खुरटी झाडं, आडवी-तिडवी फोफावलेली घाणेरी, कमरेत वाकलेली एकच डेरेदार बाभळ आणि पावसामुळे सगळीकडे तरारलेला टाकळा एवढीच झाडं आहेत. संध्याकाळच्या वेळेला माझ्या बागेत बसून तो माळ निरखायला मला फार आवडतं. मावळतीच्या सूर्याची मधाळ किरणं सगळा आसमंत सोनेरी करून टाकतात. मधूनच एखादी टिटवी ‘टिटीव टिटीव’ असं कर्कश ओरडत डोक्यावरून उडत जाते. आभाळ हळूहळू रंग उधळत अंधाराकडे वाटचाल करायला लागतं. माझ्या परसातल्या बांबूच्या बेटांची सळसळ वाढते आणि मी तशीच हिरवळीवर शांत बसून राहते.

कालही तशीच हातातला वाफाळत्या चहाचा कप कुरवाळत बागेत फिरत होते, कुंपणापलीकडचा माळ निरखत; पण आज माळ नेहमीप्रमाणे रिकामा नव्हता. शंभर-दीडशे गुबगुबीत मेंढरांचा कळप माळावर निवांत चरत होता. इवली इवली राखाडी, काळ्या-कबऱ्या रंगाची लठ्ठ कोकरे शेपटीचा आखूड झेंडा उंचावून इथे-तिथे बागडत होती. मधूनच आपल्या आयांना ढुश्या देत होती. धिप्पाड अंगाचा एक काळा कुत्रा त्या मेंढरांमागे ऐटीत चालत होता आणि त्या कळपाची मालकीण हातातल्या उंच काठीवर हनुवटी टेकवून कळपावर नजर ठेवून होती, एखादं चुकार कोकरू उड्या मारीत इथे तिथे धावायला लागलं तर लगेच हाळी देऊन त्याला नीट वाटेवर आणीत होती. माझ्याकडे पाठ करून ती उभी होती. वाऱ्याने तिच्या डोक्यावरचा पदर सारखा उडत होता. हिरवंगार लुगडं होतं तिचं, लाल किनार असलेलं. गुडघ्यापर्यंत आलेलं नेसण. खालून दिसणाऱ्या ओतीव, सडपातळ पोटऱ्या. कोपरापर्यंत आलेली खणाच्या चोळीची बाही आणि काठीवरती किंचित वाकून उभी राहिलेली ती धनगरीण. एखाद्या सुंदर शिल्पासारखी वाटली मला ती. 

तेवढ्यात कळपातले दोन एडके एकमेकांना ढुशा द्यायला लागले म्हणून ती वळली आणि ‘हुर्र्र हुर्र’ असं काहीसं ओरडत तिने हातातली काठी उगारताच ते एडके भांडण सोडून गुमान चरायला लागले. आता त्या बाईचं लक्ष माझ्याकडे गेलं होतं. मी हसले. तीही निर्मळ, तोंडभर हसली आणि डोक्यावरचा पदर नीट करत कुंपणाजवळ आली. तिच्या कपाळावर पूर्ण आडवी कुंकवाची चिरी होती आणि गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं. चेहऱ्यावर सुरकुत्यांची महिरप; पण केस मात्र चांगले काळेभोर. कानशिलावर उगाचच चुकार पांढर डोकावत होती. तिचं नक्की वय सांगणं कठीण होतं; पण पन्नाशी पार केलेली होती नक्कीच.

‘गाव कुठलं तुमचं मावशी?’ मी विचारलं.

‘पार तकडं सासवडच्या कडंला हाय. तुजं गाव कुठलं पोरी?’

‘गोवा’ मी हसून उत्तर दिलं.

‘त्ये कुठं आलं?’

‘खाली कोकणच्या बाजूला. चहा घेणार का मावशी?’ मी विचारलं.

‘हो. घेईन की आन् पोरी भाकर हाय का? सकाळधरनं हिंडावं लागतंय शेरडांमागनं. न्याहारी आनतो बांधून, पर ह्या येळला लई भूक लागती बघ.’ ती म्हणाली.

‘भाकर नाहीये हो मावशी, पाव-बिस्किटं चालतील का तुम्हाला? नाव काय तुमचं?

‘जाईबाई. चालंल की. भुकेल्या पोटाला कायबी चालतं पोरी,’ जाईबाई म्हणाली. 

मी घरात जाऊन चहा ठेवला आणि पाव गरम करून आत बटर, जाम लावलं. एका ट्रेमध्ये सगळं नीट रचून गेले बागेत घेऊन. जाईबाईने एक घास घेतला, म्हणाली, ‘चांगलं लागतंय की; पण तुमच्याकडं रांधत्यात घरी का पोरी, की ह्ये आसलंच आणून खात्यात?’

‘नाही हो. करतो ना स्वयंपाक. भात, भाजी, पोळी सगळं करतो.’

‘आसं व्हय? आन् सन कुठले पाळता?’

‘नेहमीचेच. गणेश चतुर्थी, दिवाळी.’ मी म्हटलं.

‘आमी बी करतो. आमचा द्येव बिरुबा. दिवाळी झाली, की आमी निघतू आमची मेंढरं घेऊन आणि आखाड संपत आला की जातो परत गावी. औंदा जरा उसराने आलुया.’ 

‘किती मेंढरं आहेत तुमची?’ मी विचारलं.

‘हाईत दोनशेच्या वर.’

‘सगळी दोनशेच्या दोनशे मेंढरं वेगवेगळी ओळखता येतात का तुम्हाला?’ मी एक शहरी मूर्ख प्रश्न विचारला.

जाईबाई मोकळं हसली, तिच्या शेरडांच्या गळ्यातल्या घंटा अचानक किणकिणाव्यात तशी.

‘येत्यात की. समदी येत्यात वळखाया. तुज्या क्वालीजच्या मास्तरांना न्हाय का पुढ्यातली समदी प्वारं वळखता येत? प्वाट हाय तिथं वळख इसरून कसं चालंल पोरी?

दर सालाला आमी हितंच येतू. ह्याच गावाला. आमच्या सासऱ्याच्या, त्याच्या आज्याच्या आज्याच्या येळेपासून. दुसरीकडं न्हाय जात कुठं. आधी शेतं, रानं मोकळी व्हती. आता जिमिनी विकाय काडल्या. बिल्डिंगी झाल्या. आता लई तरास हुतो.’ जाईबाई थोडंसं खिन्न हसत म्हणाली.

‘बरोबर कोण कोण आहेत तुमच्या?’ मी विचारलं.

‘मालक हाईत. ल्योक हाय, सून हाय. दोन नातवंडं हाईत. आमचं पक्कं घर हाय पोरी गावाकडं. पर फकस्त चार म्हयने राहतो तिथे. आठ म्हयने अशे मेंढरामागं हिंडत आस्तु.’

‘फिरून फिरून कंटाळा नाही येत?’ मी हसत विचारलं.

‘रीत हाय पोरी वाडवडलांची. आन् हिंडायची बी एक येगळी लत असती बघ,’ मुक्त हसून जाईबाई म्हणाली.

एव्हाना तिचा अन् माझा, दोघींचाही चहा पिऊन झालेला होता. रिकामा ट्रे माझ्या हातात देत ती बोलली, ‘बरं होऊ दे तुझं पोरी. उद्या आमी जायाचो इथून. आलीस कधी सासवडच्या बाजूला तर ये आमच्याकडं. शेरडाच्या दुधाचा च्या दीन तुला.’ गावाचं नाव सांगून ती म्हणाली आणि हातातली काठी आपटीत मेंढरं हाकायला लागली.

तिच्या चालीतली लय मात्र किती तरी वेळ मला खुणावत होती. किती सहजपणे भटक्यांचं तत्त्वज्ञान सांगून गेली होती जाईबाई मला! हिंडायची बी एक येगळी लत आसती, हेच खरं!

- शेफाली वैद्य
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XVSKCT
Similar Posts
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
माझी वेटलॉसची कहाणी - शेफाली वैद्य माझी वेटलॉसची कहाणी तशी बायकांच्या मॅगझिनमध्ये येते तशी एकदम नाट्यमय वगैरे मुळीच नाही. माझ्या वर्षापूर्वीच्या आणि आताच्या फोटोमध्ये फरक जरूर पडलाय; पण अगदी बिकिनी रेडी बॉडी वगैरे असं काही झालेलं नाहीये आणि ते मला करायचंही नाहीये. फक्त आयुष्याच्या ह्या वळणावर असताना जगण्यातील सर्व पैलू मला मनसोक्त एन्जॉय
स्वप्नं आणि स्वप्नं स्वप्नं... खूप खूप स्वप्नं.... एकामागून एक काही शुभ्र, काही काळी, तपकिरी.. निळी, हळवीसुद्धा...एकामागून एक येतात... मन डोलत राहतं... स्वप्नं पडत राहतात. त्याच्या पाठीवर पाय ठेवून सत्याचा जन्म होतो. मनाला बरं वाटतं...पायाखाली खरखरीत स्थैर्य येतं....पण
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language